"भविष्य पाहण्यास कोण येणार याचे ज्ञान त्या थोर ऋषींना होतेच. त्यामुळे तेवढ्याच सर्वांच्या पट्ट्या त्यांनी लिहून ठेवल्या" असे आपले दुसरे विधान आहे. यावर मी जर असे म्हणालो की, भाबड्या लोकांना फसवण्यासाठी भोंदू लोकांनी या पट्ट्या लिहिल्या आहेत" तर माझे म्हणणे खोटे व तुमचे खरे असा आग्रह तुम्ही कशाच्या आधारावर धरणार?
तेव्हा नाडी विज्ञानाच्या नादात आपण आपल्या बहुमूल्य वेळेचा अपव्यय करू नये अशी माझी आपणांस विनती आहे.
श्री. श्रीपाद चितळे यांनी आणून दिले. सोबत नाडी
भविष्य पुस्तक ही मिळाले. आपण पाठविलेला सर्वच मजकूर मी वाचू शकलो नाही व
वाचण्याची गरज ही नाही. कारण नाडी भविष्य हा काय प्रकार आहे याची मला जेवढे वाचले त्यावरून पुरेपूर कल्पना आली. माझे मत आपणांस घ्यावेसे वाटले याबद्दल आभारी आहे. ते प्रतिकूल असेल असा आपला अंदाजही बरोबर आहे. पण वस्तुतः आपल्याला पत्रद्वारे माझे मत समजून घेण्याची आवश्यकता नसावी. आपल्या नाडीग्रन्थात नी. र. वऱ्हाडपांडे या व्यक्तीचीही समग्र माहिती असणार. तीत वऱ्हाडपांडे नाडी भविष्याचा विरोध करणार व त्यासाठी कोणती कारणे देणार हेही लिहिलेले असणार. नाडी भविष्याला नाक न मुरडता ते वैज्ञानिकरीत्या तपासून पहावे असे आपले म्हणणे. पण वैज्ञानिक कसोट्या लावण्याआधी ज्याला वैज्ञानिक कसोट्या लावण्याची मागणी करण्यात येते ते अशा कसोट्यांवर तपासायच्या लायकीचे आहेत काय याचा विचार करावा लागतो. न्यायालयात केस दाखल केल्यावर तिचा विचार व्हावा की ती विचारात न घेताच फेटाळावी याचा न्यायाधीश विचार करतो. "प्रायमा फेसी केस" म्हणजे सकृत दर्शनी केस विचारात घ्यायच्या लायकीची आहे की नाही याचा विचार केला जातो. नाडी भविष्याच्या केसला 'प्रायमा फेसी' वाजवीपणाच नाही त्यामुळे त्याची वैज्ञानिक तपासणी करण्यात वेळ घालविणे एखाद्या इस्पितळातील डोके बिघडलेल्यांच्या बडबडीला वैज्ञानिक कसोट्या लावून तिचा खरेपणा तपासून पाहण्याइतके निरर्थक आहे.