वस्तुस्थिती काय आहे, हे वाचकांना कळू नये यासाठी विपर्यस्त वा खोटी विधाने करणे, सत्यशोधनास मदत करणारी विधाने दडपणे, त्यासंबंधीचे महत्त्वाचे उल्लेख टाळणे यासारखे कुतंत्र आपण आपल्या लेखात बिनदिक्कतपणे वापरले आहे. आपल्या लेखाविषयीचे माझे हे म्हणणे आपण जाहीरपणे खोडून काढावे व नाडी भविष्याविषयीचे सत्य शोधण्यास आपल्या समितीने खरोखरच पुढे यावे यासाठी मी हे अनावृत पत्र आपल्या समितीला लिहीत आहे. आपल्या लेखाच्या प्रारंभी, या नाडी भविष्याकडे महाराष्ट्राचे लक्ष पुन्हा एकदा वेधणारे (यापूर्वी शांताराम आठवले यांनी या नाडी भविष्यकडे मराठी माणसाचे लक्ष एकदा वेधले होते.) विंग कमांडर शशिकांत ओक (मद्रास) यांच्यावर आपण असा आरोप केला आहे की आपला "नाडीभविष्याचा" अनुभव कोणत्याही वैज्ञानिक कसोटीवर न तपासून पहाता तो जणू काही सत्यच आहे असे ढोल पिटण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. श्री. ओकांनी 'नाडी भविष्य' नावाचे जे एक छोटे पुस्तक लिहिले आहे त्याला उद्देशून आपण 'ढोल पिटणे' हा शब्दप्रयोग केला आहे हे उघड आहे. क्षमभर असे समजू की आपल्या समितीची 'वैज्ञानिक कसोटी' ओकांना माहीत नसल्यामुळे त्यांनी स्वतः च्याही 'अवैज्ञानिक पद्धतीने केलेल्या संशोधनातूनही नाडीचे सत्य पटल्यामुळे हे 'ढोल पिटणे' सुरू केले, ही त्यांनी चूक केली. म्हणून आपल्या समितीला माझी अशी जाहीर विनंती आहे की समितीने आपल्या 'वैज्ञानिक कसोटी' वर ओकांचा हा 'डोल' जाहीरपणे फोडावा, म्हणजे ओकांना ते खोटे पुस्तक लिहिल्याबद्दल पश्चात्ताप होऊन ते बाजारातून ताबडतोब काढून घेणे त्यांना भाग पडेल. परिणामी आपल्या समितीचा ढोलही आपोआपच सर्वत्र पिटला जाईल व 'शास्त्रीय सत्याची कैवारी. म्हणून तिचा नावलौकिक चौफेर पसरेल !