माणसाचा जन्म कुठून होतो, का होतो, तो जन्म घेण्यापुर्वी कुठे होता या प्रश्नांची उत्तरे जड विज्ञानावर आधारलेला डार्विनचा उत्क्रांतिवादी सिद्धांत कसे देऊ शकत नाही हे मागच्या लेखात आपण पाहिले.
अध्यात्म विज्ञानाचा सिद्धांत या प्रश्नांची उत्तरे देतो काय, देत असेल तर कसे देतो हे आता आपल्याला या लेखात पाहावयाचे आहे. त्यासाठी अध्यात्माचा सिद्धांत कोणता व तो वैज्ञानिक ( शास्त्रीय) आहे काय, हे प्रथम पाहिले पाहिजे. कारण विज्ञानपद्धतीमुळेच सत्याचा शोध घेता येतो. एकादा सिद्धांत वैज्ञानिक आहे काय हे तो सिद्धांत भाकिते करतो काय व ती भाकिते प्रत्यक्ष प्रयोगाने खरी ठरतात काय यावर अवलंबून असते. वैज्ञानिक सिद्धांताच्या सत्याची ही कसोटी आहे. या कसोटीवर डार्विनचा उत्क्रांतिवाद सिद्धांत भाकितेच करत नसल्यामुळे (ती खरी ठरण्याचा प्रश्नच नाही) तो सिद्धांत अवैज्ञानिक ( व म्हणून असत्य) असल्याचे आपण मागच्या लेखातील ‘डार्विनचा सैद्धांतिक मृत्यू’ या पोट मथळ्याखाली पाहिले आहे.