“आम्ही, काका-पुतण्या तीन वर्षांनी वरसईला परतलो. माझ्या खांद्यावर कावड होती. वेशीवर आल्याचे पाहून गावकऱ्यांनी वाजत गाजत वैजनाथेश्वर मंदिराकडे मिरवणूक काढली.
घरच्यांनी छातीशी धरून स्वागत केले. सर्व भिक्षुक मंडळी जमल्यावर आई वडीलांना गंगोदकाने स्नान घातले. दान-दक्षिणा दिली. जमलेल्या सर्वांना पळीने गंगौदक दिले. काशी यात्राकरून आलो म्हणून मावंदे घालून ४५० अतिथींना पुरणपोळीचे भोजन देऊन संकल्प पूर्ण केला.
रात्रीच्या निवांतपणात घडलेल्या घटना सांगताना त्या आठवणी पुन्हा पुन्हा ताज्या होत राहिल्या.
बरीच वर्षे सरली. श्री.चिंतामणराव वैद्य यांच्या आग्रहा खातर जशा आठवल्या तशा सुबक मोडीलिपीत लिहून काढल्या