Alka Oak's E-book shoppy🚩
Search

Cart

More Details

लोक आपले अनुभव गुप्त का ठेवतात?

कोणतेही मत अनुभव आल्याशिवाय कोणी बनवत नाही. रूढ विज्ञानाच्या नियमात न बसणाऱ्या घटनांचा अनुभव आल्याशिवाय त्या घटना शक्य असल्याचे मत कोणी नोंदविणार नाही. निदान असे अनुभव आलेल्या जवळच्या व्यक्तींचा परिचय तरी त्यांना असला पाहिजे असे म्हणावे लागते. असे अनुभव आलेल्या व्यक्तींची संख्याही प्रचंड असल्याशिवाय त्यावर विश्वास असणाऱ्यांची संख्या इतकी मोठी असणार नाही, हे उघड आहे. असे अनुभव आलेले लोक इतक्या मोठ्या संख्येने असतील तर आपला अनुभव जाहीर करणाऱ्यांची संख्याही मोठी असावयास पाहिजे. पण ती तशी दिसत नाही. आपला अनुभव हे लोक गुप्त का ठेवतात ? असा यावर कोणी प्रश्न विचारील. याला उत्तर 'तशी संधी त्यांना मिळत नाही' हेच आहे. खासगीत ते आपला अनुभव सांगत असतातच. तसा प्रसंग उद्भवला तर ते आपला अनुभव जाहीरपणेही सांगायला मागेपुढे पाहत नाहीत असे आढळून आले आहे. याचे एक अलीकडे घडलेले प्रसिद्ध उदाहरण म्हणजे महाराष्ट्र विधानपरिषदेचे भूतपूर्व सभापती व प्रसिद्ध विचारवंत दिवंगत वि. स. पागे यांनी आपणाला आलेल्या एका चमत्काराच्या अनुभवाचे एका जाहीर सभेत केलेले कथन हे होय.