अनुराधाबाईंचा चंदूर गावातील चमत्कार
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात मसलेचौधरी नावाचे एक लहान खेडे आहे. या खेड्यातील एका पडदानशीन मराठा कुटुंबातील अनुराधा नावाच्या स्त्रीच्या अंगात सोमनाथ या देवाचा त्याच्यावरील लहानपणापासूनच्या भक्ती-उपासनेमुळे, संचार होत असल्याची व या संचार अवस्थेत तिच्या रिक्त हातातून विभूती, गुलाल, रुद्राक्ष, बेल इ. वस्तू निघत असल्याची घटना सुमारे पाच वर्षांपासून घडत असल्याचे सांगण्यात येते. (हा लेख १९८८ साली लिहिला आहे.) याविषयीचे सविस्तर वृत्त 'श्री' साप्ताहिकाने आपल्या २८ फेब्रु. ते ६ मार्च ८७ च्या अंगात प्रथम प्रसिद्ध केले. पण 'श्री' नेहमी खोट्या बातम्या देते, अशी स्वतःची सोईस्कर समजूत करून घेतलेल्या अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले.