मानव या विश्वातील स्वतः च्या स्थानाविषयी व विश्वाच्या खऱ्या स्वरूपाविषयी फार प्राचीन काळापासून चिंतन करीत आला आहे. आतापर्यंत हा विषय धर्माचा व तत्त्वज्ञानाचा असून या क्षेत्रातील तज्ज्ञ जे सांगतील तेच खरे होय, असे मानण्यात येत होते. पण विज्ञानाच्या उदयाबरोबर ही परिस्थिती पालटली असून हल्ली वैज्ञानिकांचा शब्द प्रमाण मानण्यात येतो. स्वाभाविकच जेथे धार्मिक व वैज्ञानिक विचारात विरोध निर्माण होतो, तेथे धार्मिक विचारांना अंधश्रद्धेत ढकलून वैज्ञानिक विचारांचा पुरस्कार करण्याकडे सामान्यतः प्रवृत्ती दिसून येते. हे स्वाभाविक असून योग्यही आहे. पण असे करताना दुसऱ्या टोकाला जाऊन विज्ञान जे सांगते, ते शंभर टक्के बरोबर आहे, असे प्रतिपादण्याची, म्हणजे दुसऱ्या एका नव्या वैज्ञानिक अंधश्रद्धेचे परिपोषण करण्याची चूक आपल्या हातून घडता कामा नये, याचीही आपण काळजी घेतली पाहिजे.