महाराष्ट्रात 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती' या नावाने एक संघटना स्थापून आपल्या विशिष्ट मतप्रणालीचा राजकीय थाटात काही लोक प्रचार करीत असतात हे आता सर्वांना माहीत झाले आहे. कुणालाही कुठल्याही मतप्रणालीचा प्रचार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आपल्या राज्यघटनेने दिलेले आहे. तेव्हा या लोकांच्या या संघटनेला व त्यांच्या स्वतः च्या मतप्रणालीच्या प्रचाराला कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. पण हे लोक आपल्या राजकीय मतप्रणालीचा प्रचार विज्ञानाच्या नावाखाली करतात, व तेही खोट्या बक्षिसाचे आव्हान देऊन, हे आक्षेपार्ह आहे. त्यांची राजकीय वा इतर मते कांहीही असोत. पण पुनर्जन्म किंवा तादृश अतींद्रिय घटना अशक्य असल्याचे आपले मत त्यांनी खोट्या बक्षिसाचे आव्हान व विज्ञानाचा बुरखा घेऊन करावे हे आक्षेपार्ह आहे. 'खोट्या बक्षिसाचे आव्हान' म्हणण्याचे कारण हे त्यांचे बक्षिसाचे आव्हान खऱ्या विज्ञानवृत्तीतून दिलेले नाही. विनम्र व सत्यशोधकाच्या भावनेने स्वीकारले असते, तर त्यांचे हे आव्हान कोणीही समजू शकले असते. पण असे आमंत्रण जणू काही त्या व्यक्तीने आपल्याला दिलेलेच नाही अशा आविर्भावात तिची अतींद्रिय शक्ती न तपासताच तिच्यावर फसवणुकीचा त्यांनी आरोप करावा, याला काय म्हणावे? आणि हेच सर्वात आक्षेपार्ह व चीड आणणारे आहे.